
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागपूरकराने आपल्या परिसरातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूरकरांना शुभेच्छा देताना त्यांनी स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच त्याची सुरक्षितता जपण्याची जबाबदारीही प्रत्येक नागरिकाची आहे. समाजातील प्रत्येक घटकाने जागरूकता आणि जबाबदारीची भावना ठेवून योगदान दिल्यास शहर अधिक सुरक्षित बनू शकते, असे त्यांनी नमूद केले.
गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांची जागरूकता महत्त्वाची-
गुन्हेगारीला आळा घालणे आणि कायदा-सुव्यवस्था राखणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभागही गरजेचा आहे. परिसरातील अनोळखी व्यक्तींची वर्दळ, संशयास्पद हालचाली किंवा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता पोलिसांना कळवावे.
वेळीच मिळालेली माहिती पोलिसांसाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होते. नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करून पोलिस आणि जनतेतील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने माहिती द्या-
शहरातील शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. परिसरात काही संशयास्पद प्रकार आढळल्यास भीती न बाळगता किंवा दुर्लक्ष न करता त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी. नागरिकांनी पोलिसांचे डोळे आणि कान बनून सहकार्य केल्यास अनेक गुन्हे आणि अनुचित घटना रोखण्यास मदत होईल, असा विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला.
पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास व समन्वय वाढला तर शहरातील गुन्हेगारीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे अधिक सुलभ होईल. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागपूरकराने शहराच्या सुरक्षिततेसाठी सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.