हिरक महोत्सवी वर्षाचा दिमाखात शुभारंभ; आधुनिक वैद्यकीय सुविधांचा प्रारंभ

Image Source:(Internet)
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी उपचाराचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेयोच्या हिरक महोत्सवी वर्षाला आज उत्साहात सुरुवात झाली. पुढील काळात रुग्णांना अधिक अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मेयोच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. भावना सोनवणे, डॉ. राजीव खंडेलवाल, माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गेल्या सहा दशकांच्या प्रवासात मेयोने नागपूर आणि विदर्भातील आरोग्यसेवेला मोठे योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत हजारो रुग्णांना येथे उपचार मिळाले आहेत. गंभीर आजारांवर यशस्वी उपचार करून अनेक रुग्णांना नवजीवन देण्यात मेयोतील डॉक्टरांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मेयोचा इतिहास हा केवळ वैद्यकीय शिक्षणाचा नसून समाजसेवेचा आणि जनतेच्या विश्वासाचा इतिहास असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
हिरक महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णकेंद्रित विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. रुग्णांच्या गरजा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेऊन महाविद्यालयातील समिती सदस्यांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर मेयोच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच मेयोमधून शिक्षण घेतलेल्या देश-विदेशातील नामांकित डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना रुग्णसेवेत योगदान देण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हिरक महोत्सवाच्या निमित्ताने रुग्णांसाठी काही आधुनिक सुविधांचाही प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते डिजिटल मॅमोग्राफी, पेन क्लिनिक आणि केंद्रीय वैद्यकीय प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल थेट रुग्णांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देणाऱ्या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी प्रास्ताविकातून मेयोच्या सहा दशकांच्या वाटचालीचा आढावा घेतला. गर्भातील बाळामध्ये हिमोग्लोबिनशी संबंधित विकारांचे अचूक निदान करण्याच्या क्षेत्रात मेयो देशातील अग्रगण्य केंद्रांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. गोपाल अग्रवाल यांनी केले. त्यांनीच उपस्थितांचे आभार मानले.