
Image Source:(Internet)
कुडाळ : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी आता प्रत्यक्षात येणार आहे. केंद्र सरकारने आगामी जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसींच्या जातीनुसार माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतल्याने समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे.
या निर्णयाचे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे आणि भंडारी युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष समिल जळवी यांनी स्वागत केले आहे. त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानत हा निर्णय ओबीसी समाजासाठी ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.
जातनिहाय जनगणनेची मागणी पुढे नेण्यासाठी भोगटे आणि जळवी यांनी यापूर्वी तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शासनाच्या विविध स्तरांवर निवेदने सादर केली होती. याशिवाय पत्रकार परिषदांच्या माध्यमातूनही त्यांनी शासनाचे लक्ष वेधत ही मागणी सातत्याने लावून धरली होती.
जनगणनेत ओबीसींच्या जातीनुसार माहिती उपलब्ध झाल्याने समाजाची वास्तविक लोकसंख्या आणि सामाजिक स्थिती स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. या आकडेवारीच्या आधारे ओबीसी समाजासाठी आवश्यक योजना, कल्याणकारी उपक्रम आणि शासकीय धोरणे अधिक प्रभावीपणे आखता येतील, असा विश्वास भोगटे व जळवी यांनी व्यक्त केला.
दीर्घकाळ केलेल्या पाठपुराव्याला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ओबीसी समाजात समाधानाचे वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले.