नागपुरात गर्भपाताच्या प्रतिबंधित औषधांचा अवैध साठा; दोघांना अटक

    14-Aug-2026
Total Views |
यशोधरानगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १ लाख ६१ हजारांचा औषधसाठा जप्त

Image Source:(Internet)

नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित औषधांसह इतर औषधांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विनोबा भावेनगर येथील श्री साई दवाखान्यावर छापा टाकून सुमारे १ लाख ६१ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त केला. या प्रकरणात राजेश चरडे आणि सुधाकर उचके या दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

औषध निरीक्षक स्वाती भरडे यांना श्री साई दवाखान्यात आवश्यक परवानगीशिवाय गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे, पुरुषांमधील कामोत्तेजना वाढविणारी औषधे तसेच इतर औषधांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दवाखान्यावर छापा टाकला.

कारवाईदरम्यान सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा विनापरवाना औषधसाठा, अल्प्राझोलमच्या गोळ्या तसेच गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे आढळून आली. चौकशीदरम्यान डॉक्टर सचिन मरघडे यांनी काही औषधे राजेश चरडे याच्याकडून मिळाल्याचे सांगितले.

त्यानंतर औषधांचा पुरवठा करण्यासाठी राजेश चरडे दवाखान्यात आला असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत राजेशने ही औषधे सुधाकर उचके याच्याकडून मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सुधाकर उचकेलाही अटक केली.

तपासादरम्यान खरबी परिसरातील मयूर जायसवाल हा औषधांचा पुरवठा करीत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरीही छापा टाकला. मात्र, तेथे कोणताही आक्षेपार्ह औषधसाठा आढळला नाही. मयूर जायसवाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

या प्रकरणात राजेश चरडे आणि सुधाकर उचके यांना अटक करण्यात आली असून, सचिन मरघडे आणि मयूर जायसवाल यांचा शोध सुरू आहे. यशोधरानगर पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्रतिबंधित आणि विनापरवाना औषधांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या औषधांच्या पुरवठ्याचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.