शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना भूमापकाला रंगेहाथ पकडले

Image Source:(Internet)
नागपूर : जमिनीच्या शासकीय अभिलेखातील विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भूमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विशाल माडगीकर असे कारवाई करण्यात आलेल्या भूमापकाचे नाव आहे.
पारशिवनी येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. हिंगणा बाराबाई परिसरातील एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या विभाजनाचे काम प्रलंबित होते. संबंधित जमीन डब्ल्यूसीएलच्या प्रकल्पात गेल्याने त्याच्या नोकरीशी संबंधित प्रक्रियेसाठी हे विभाजन आवश्यक असल्याचे समोर आले.
हे काम करून देण्यासाठी माडगीकर याने शेतकऱ्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. लाचेची मागणी होताच शेतकऱ्याने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने गुरुवारी पारशिवनीतील भूमि अभिलेख कार्यालय परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याकडून २५ हजार रुपये स्वीकारताच पथकाने माडगीकर याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी पारशिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्याने झालेल्या या कारवाईमुळे भूमि अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे.