नागपुरातील अतिक्रमणांचे सर्वे तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

    14-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील सरकारी जागा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांविरोधात महापालिकेने आता व्यापक कारवाईची तयारी सुरू केली आहे. अतिक्रमणग्रस्त जागांची पाहणी करून सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नागपूर जिल्हा अतिक्रमण कारवाई कृती दलाचे अध्यक्ष तथा मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित विभागांना दिले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर नागपूर जिल्ह्यातील अतिक्रमणे हटविण्यासाठी आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या कृती दलाची बैठक शुक्रवारी आयुक्त कार्यालयातील सभागृहात पार पडली.

बैठकीत अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी विविध शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारवाईदरम्यान पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी आधीच संपर्क साधावा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. अतिक्रमित बांधकामे हटविण्यासाठी आवश्यक जेसीबीसह इतर साधनसामग्री महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

झोननिहाय कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या. अतिक्रमित जागांची प्रत्यक्ष पाहणी करून तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून रस्ते आणि सरकारी जागांवरील अतिक्रमणांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

महापालिकेने अतिक्रमण हटविण्यासाठी बजावलेल्या नोटिसांची मुदत संपलेली असल्यास संबंधित बांधकामांवर विलंब न करता कारवाई करावी, असेही आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले.

अतिक्रमण हटवल्यानंतर जागांचे संरक्षण

खुल्या जागांवरील अतिक्रमणे हटविल्यानंतर त्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी तातडीने संरक्षण भिंती उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक ठिकाणी अडथळे उभारण्याचे निर्देशही देण्यात आले. एकदा अतिक्रमण हटविल्यानंतर संबंधित जागेची नियमित देखरेख करून ती पुन्हा अतिक्रमणमुक्त राहील, याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

बैठकीला महापालिका, पोलिस, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, महावितरण आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.