
Image Source:(Internet)
नागपूर : हावडा-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमधून तस्करी करून नेले जात असलेले अंदाजे १.२४२ किलो विदेशी सोने आरपीएफ आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) संयुक्त पथकाने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची अंदाजे किंमत १.९६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई-
दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफ गुन्हे शाखा, नागपूर आणि रायपूर तसेच DRI, नागपूर यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. आरपीएफ गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दुरंतो एक्स्प्रेसमधून दोन प्रवासी मोठ्या प्रमाणात विदेशी सोने घेऊन प्रवास करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी विशेष संयुक्त पथक तयार केले. पथकाने रायपूरपासून ट्रेनवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि प्रवाशांची तपासणी सुरू केली.
B-12 कोचमध्ये सापडले सोने-
ट्रेन भंडारा आणि नागपूरदरम्यान असताना पथकाला एसी कोच B-12 मध्ये दोन संशयित प्रवासी आढळले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली तसेच सामानाची कसून तपासणी केली.
तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना विदेशी सोन्याची सात बिस्किटे आणि सोन्याची एक वडी आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे एकूण वजन सुमारे १.२४२ किलो असल्याचे सांगण्यात आले आहे.
वैध कागदपत्रे सादर करण्यात अपयश-
चौकशीदरम्यान दोन्ही संशयितांना सोन्याच्या खरेदी आणि वाहतुकीशी संबंधित वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यानंतर आरपीएफ आणि DRIच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि सोने जप्त केले.
या कारवाईमुळे रेल्वेमार्गे विदेशी सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा करण्यात येत आहे. जप्त केलेल्या सोन्याचा स्रोत, ते कुठून आणण्यात आले आणि पुढे कुठे नेण्यात येत होते, याबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.