मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार गारेगार; 2029 पर्यंत 238 एसी लोकल, सेकंड क्लासच्या भाड्यात वाढ नाही

    13-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला लवकरच आधुनिक आणि आरामदायी स्वरूप मिळणार आहे. मुंबईतील लोकल सेवा मेट्रोच्या धर्तीवर अत्याधुनिक आणि एसी करण्याच्या दिशेने केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी माहिती देताना मुंबईला एकूण 238 अत्याधुनिक एसी लोकल मिळणार असल्याचे सांगितले.

मुंबईतील लोकल ट्रेन आधुनिक करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, ट्रेन निर्मितीच्या कामाला अपेक्षित वेग मिळत नसल्याने या प्रकल्पाला विलंब होत होता. त्यामुळे 2030 पूर्वी सर्व ट्रेन उपलब्ध होण्याची शक्यता कमी होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा केली.

यानंतर ट्रेन निर्मितीचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन कोच फॅक्टरीमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. वंदे भारत ट्रेनची निर्मिती ज्या कारखान्यांमध्ये केली जाते, त्याच ठिकाणी मुंबईसाठीच्या आधुनिक लोकल ट्रेनही तयार केल्या जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

2027 मध्ये पहिली ट्रेन मुंबईच्या सेवेत-
मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, 2027 मध्ये एसी लोकलच्या पहिल्या मालिकेतील ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ट्रेनची संख्या वाढवत 2029 पर्यंत मुंबईतील लोकल सेवा मोठ्या प्रमाणावर आधुनिक आणि एसी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

एसी लोकल, पण सेकंड क्लासच्या भाड्यात वाढ नाही-
एसी लोकल सुरू झाल्यानंतर प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार का, याबाबत मुंबईकरांमध्ये उत्सुकता होती. मात्र, सेकंड क्लासच्या भाड्यात वाढ केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एसी आणि आधुनिक लोकलचा फायदा घेतानाच प्रवाशांना भाडेवाढीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईकरांसाठी आधुनिक पद्धतीच्या लोकल ट्रेन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

विरोधकांवरही फडणवीसांचा निशाणा-

दरम्यान, संसदेतील विरोधकांच्या आंदोलनावरूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. संविधान आणि लोकशाहीवर विश्वास असेल तर चर्चेसाठी संसद हेच योग्य व्यासपीठ असल्याचे त्यांनी म्हटले.

विरोधक संसदेत चर्चा करण्यास घाबरत असून, संसदेला सामोरे जाण्याची त्यांच्यात हिंमत नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. चौकात आंदोलन करण्याऐवजी संसदेत मुद्दे मांडावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अमित शाह संसदेत उपस्थित नसल्याचा बहाणा विरोधकांनी केला होता; मात्र अमित शाह यांनी पत्र दिल्यानंतरही विरोधकांनी संसदेतून माघार घेतल्याचा आरोप करत फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.