जखमी वन्यजीवांच्या उपचारासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ३९.६९ कोटींचा निधी मंजूर

    13-Aug-2026
Total Views |
ताडोबा-अंधारीला ३.५५ कोटी, पेंचसाठी २ कोटी; वन्यजीव संवर्धनाला मिळणार बळ

Image Source:(Internet)

मुंबई : अपंग, जखमी तसेच विशेष काळजीची आवश्यकता असलेल्या वन्यजीवांच्या उपचार आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने राज्यातील वन्यजीवांच्या देखभाल, उपचार आणि संवर्धनासाठी तब्बल ३९ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीतून राज्यातील विविध वनक्षेत्रांमध्ये जखमी आणि अपंग वन्यजीवांसाठी उपचार, देखभाल तसेच आवश्यक संवर्धनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मंजूर निधीचा वापर शासनाने निश्चित केलेल्या नियम व कार्यपद्धतीनुसार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

मंजूर निधीपैकी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला ३ कोटी ५५ लाख रुपये, तर पेंच वनक्षेत्रासाठी २ कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय पुणे वन विभागाला २ कोटी १५ लाख रुपये आणि डहाणू वनक्षेत्रासाठी २ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जखमी किंवा अपंग वन्यजीवांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांची सुरक्षितपणे देखभाल व पुनर्वसन करता यावे, यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर शासनाने भर दिला आहे.

वन्यजीव संरक्षणाशी संबंधित कायदे व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकारी आणि विभागांना देण्यात आले आहेत. निधीचा योग्य वापर करून वन्यजीवांचे संरक्षण, उपचार आणि पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.