
Image Source:(Internet)
मुंबई : आघाडीची FMCG कंपनी Godrej Consumer Productsच्या शेअरमध्ये बुधवारी मोठी घसरण पाहायलाळाली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO सुधीर सीतापती यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आणि शेअरच्या किंमतीवर त्याचा थेट परिणाम झाला.
बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर 10 टक्क्यांहून अधिक घसरून ₹915.60 या 52 आठवड्यांच्या नव्या नीचांकी पातळीवर पोहोचला. उपलब्ध बाजारमाहितीनुसार शेअरमध्ये सुमारे 11 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.
CEO पदाचा अचानक राजीनामा-
सुधीर सीतापती यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2031 पर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र, त्यांनी मुदत पूर्ण होण्यापूर्वीच पद सोडण्याचा निर्णय घेतला. या अनपेक्षित नेतृत्वबदलामुळे बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
कंपनीने विद्यमान ग्रुप CFO आसिफ मलबारी यांची पुढील पाच वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच विशाल केडिया यांच्याकडे अंतरिम CFO पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ब्रोकरेज कंपन्यांची संमिश्र भूमिका-
CEO बदलाच्या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज कंपन्यांनी शेअरबाबत वेगवेगळी भूमिका घेतली आहे. काही संस्थांनी लक्ष्यभाव कमी करत सावध भूमिका घेतली असली, तरी काही ब्रोकरेजनी शेअरमध्ये खरेदीचा सल्ला कायम ठेवला आहे.
Moneycontrol वरील उपलब्ध ब्रोकरेज डेटानुसार ICICI Securities आणि Motilal Oswal यांनी अलीकडे ‘Buy’ रेटिंगसह ₹1,300 चे लक्ष्य दिले आहे.
गुंतवणूकदारांचे लक्ष पुढील घडामोडींवर-
अचानक झालेला CEO बदल, नवीन व्यवस्थापनाची रणनीती आणि कंपनीच्या आगामी कामगिरीचा शेअरवर काय परिणाम होतो, याकडे आता बाजाराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बुधवारी झालेली मोठी घसरण पाहता गुंतवणूकदारांसाठी पुढील काही सत्रे महत्त्वाची ठरणार आहेत.
टीप : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी स्वतंत्र आर्थिक सल्ला घेणे योग्य ठरेल.