
Image Source:(Internet)
बीड : इमामपूर रोड परिसरात रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर गोळीबारात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वादाच्या वेळी तब्बल ३० ते ३५ जण घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. याच वादातून वाल्मिक कराड समर्थक असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या सफान खान याने कथितरित्या चार राऊंड गोळीबार केल्याचा आरोप आहे.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार जणांसह काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
गोळीबारामागील नेमके कारण काय होते, वादाची सुरुवात कशामुळे झाली आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाची भूमिका काय होती, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना अटक कधी केली जाते आणि गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र पोलिसांच्या हाती लागते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या पुढील तपासानंतर या घटनेचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.