जरांगेंच्या आंदोलनाला प्रसाद लाडांची आर्थिक रसद? लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

    11-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पंढरपूर : मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींची रद्द झालेली जात प्रमाणपत्रे पुन्हा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Jarange) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. या आंदोलनामागे भाजप आमदार प्रसाद लाड यांचा आर्थिक पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधताना हाके यांनी मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली. प्रसाद लाड यांना जरांगे यांना आर्थिक रसद पुरवण्याची सवय लागली असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, जरांगे हे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही हाके म्हणाले.

लाड यांच्या क्रिस्टल ग्रुप कंपनीतील रोजगार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरही हाके यांनी प्रश्न उपस्थित केले. कंपनीत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी असल्याचा दावा केला जात असला, तरी तेथे आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठीही प्रसाद लाड यांनी जरांगे यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप हाके यांनी केला. सरकारने लाड यांना एवढे महत्त्व का दिले आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतील, त्या त्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने प्रतिसभा घेऊन समाजाची एकजूट दाखवण्यात येईल, अशी घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली.

हाके यांच्या या आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता असून, प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.