
Image Source:(Internet)
मुंबई : मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय कामकाजावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर प्रदेशासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
मुसळधार पाऊस, अनेक भागांतील पाणी साचणे आणि वाहतुकीवर झालेला परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र विधानसभेचे आजचे अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने विविध उपाययोजना लागू केल्या आहेत.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांना कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता इतर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, जेणेकरून ते सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत मुसळधार पावसासह ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.