
Image Source:(Internet)
पुणे : मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सोमवारी पहाटे हृदयद्रावक दुर्घटना घडली. पाटण गावात एका घरावर अचानक दरड कोसळल्याने तिकोणे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये नंदू दत्तू तिकोणे, त्यांच्या पत्नी अनिता तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर तिकोणे यांचा समावेश आहे. दरड कोसळल्यानंतर घर पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले.
मावळचे तहसीलदार, अग्निशमन दल तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर तिघांचेही मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, ज्ञानेश्वर तिकोणे यांचा विवाह गेल्याच वर्षी झाला होता. त्यांच्या पत्नी त्या वेळी बाहेरगावी असल्याने त्या या दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्या.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाटण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.