
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना आणि वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात तात्काळ आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा त्वरित आढावा घेऊन राज्यातील नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडावी, असेही त्यांनी म्हटले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात दरवर्षी पाऊस पडतो आणि मुंबई-पुण्यासाठीही हा नवा विषय नाही. मात्र, यंदा निर्माण झालेली परिस्थिती अभूतपूर्व असून राज्यातील अनेक भाग अक्षरशः ठप्प झाले आहेत. त्यामुळे सरकारने याकडे गंभीरतेने पाहून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
त्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मिसिंग लिंक प्रकल्पाचा परिसर तसेच ताम्हिणी घाटातील वाहतूक प्रभावित झाली आहे. आळंदीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे. दरडी कोसळणे आणि रस्ते खचण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करताना सुळे यांनी या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोठा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे सुरक्षा परीक्षण झाले होते का? तसेच नैसर्गिक आपत्तींचा विचार करून नियोजन करण्यात आले होते का, याची माहिती सरकारने जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.
वसई-विरार, भांडूप, मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांचीही स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकल्पांवर झालेला खर्च, सुरक्षा उपाययोजना आणि पर्यावरणीय निकषांचे पालन याबाबत पारदर्शक माहिती देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
"मुंबई आणि पुण्यासारख्या दोन प्रमुख शहरांमधील संपर्कच विस्कळीत झाला आहे. अशा परिस्थितीत रुग्ण, विद्यार्थी, डॉक्टर तसेच अत्यावश्यक सेवांशी संबंधित नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. एका पावसाने संपूर्ण राज्याची यंत्रणा ठप्प होणे ही गंभीर बाब असून सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत," असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.