
Image Source:(Internet)
लंडन : महिला टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा टी-20 विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकांत ४ बाद १५० धावा केल्या. कर्णधार नॅटली सायव्हर-ब्रंट हिने नाबाद ५८ धावांची संयमी खेळी साकारली, तर फ्रेया केम्पने नाबाद ४४ धावा करत पाचव्या विकेटसाठी दोघींनी ८० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर १५१ धावांचे आव्हान ठेवले.
मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. सलामीवीर बेथ मूनी हिने ४९ चेंडूंत ६४ धावांची शानदार खेळी करत विजयाचा पाया रचला. तिच्या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. फोबी लिचफिल्डने ४८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देत मूनीसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी उभारली. या जोरावर ऑस्ट्रेलियाने अवघ्या १७.१ षटकांत ३ बाद १५३ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने २०१०, २०१२, २०१४, २०१८, २०२०, २०२३ आणि आता पुन्हा एकदा २०२६ मध्ये टी-20 विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. दुसरीकडे, २००९ नंतर पुन्हा विश्वविजेते होण्याचे इंग्लंडचे स्वप्न अपूर्णच राहिले.
गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला इंग्लंडवर दबाव निर्माण केला. त्यानंतर अचूक मारा आणि प्रभावी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. फलंदाजांनीही जबाबदारीने खेळ करत आणखी एका विश्वविजेतेपदावर ऑस्ट्रेलियाचे नाव कोरले.