
Image Source:(Internet)
मुंबई : देशातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात देशभरातील ५८ अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालयांचे कामकाज बंद करण्यास मंजुरी दिली आहे. याचबरोबर विविध संस्थांमधील ९५० पेक्षा अधिक तांत्रिक अभ्यासक्रमही कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत.
या कारवाईत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही राज्ये सर्वाधिक प्रभावित ठरली आहेत. दोन्ही राज्यांतील प्रत्येकी १२ महाविद्यालयांवर टाळे लागले आहे. बंद झालेल्या ५८ संस्थांपैकी तीन सरकारी अनुदानित असून, उर्वरित सर्व खासगी शैक्षणिक संस्था आहेत.
AICTE च्या माहितीनुसार, अनेक महाविद्यालयांमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रवेशसंख्या सातत्याने घटत होती. त्याचबरोबर आवश्यक पात्रतेचे प्राध्यापक उपलब्ध नसणे, प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक सुविधांचा अभाव, तसेच AICTE च्या निकषांचे पालन न करणे, ही कारवाईमागील प्रमुख कारणे ठरली.
या निर्णयामुळे तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जात असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांनाच भविष्यात प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी संबंधित महाविद्यालयाची मान्यता आणि शैक्षणिक गुणवत्ता तपासूनच निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.