Image Source:(Internet)
नागपूर : मानकापूर (Mankapur) परिसरात मध्यरात्री झालेल्या खुनाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराबाहेरील शेडखाली झोपलेल्या 43 वर्षीय व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोराने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.
मृताची ओळख मेहताब सिंग चौधरी (वय 43, रा. एलआयसी कॉलनी, दिव्यनगरी, मानकापूर) अशी झाली आहे. ते नेहमीप्रमाणे घरासमोरील लोखंडी शेडखाली झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोराने त्यांच्यावर कुऱ्हाडीने चेहऱ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या मेहताब सिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर मृताच्या पत्नी गीता चौधरी यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलीस तातडीने तेथे दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम राबवली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने एका संशयिताला अटक केली. हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीचा सहभाग उघड करण्यासाठी त्याची कसून चौकशी सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहेत.