कामाच्या ताणाचा परिणाम; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

    04-Jul-2026
Total Views |
 
Eknath Shinde
 Image Source:(Internet)
 
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती शुक्रवारी अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिवसेना सूत्रांनी दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या बैठका, दौरे आणि राजकीय घडामोडींमुळे शिंदे यांच्यावर कामाचा मोठा ताण होता. विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
 
प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे ठाण्यात आयोजित करण्यात आलेले सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले. धुळ्यातील ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
 
अलीकडच्या काळात राज्यातील राजकीय घडामोडी, विविध दौरे आणि पक्षसंघटनात्मक कार्यक्रमांमुळे एकनाथ शिंदे सतत व्यस्त होते. या धावपळीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.