नागपुरात लग्नाचे आश्वासन देत महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; तरुणाविरुद्ध गुन्हा

    31-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : ऑनलाइन विवाह संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका ३४ वर्षीय महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेची ओळख प्रितम लावणकर याच्याशी एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळाद्वारे झाली होती. ओळखीनंतर दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला आणि काही वेळा त्यांची प्रत्यक्ष भेटही झाली.

तक्रारीनुसार, १७ मे रोजी आरोपीने महिलेला बजाजनगर परिसरातील एका निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले. तेथे लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्याशी अश्लील वर्तन केले आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने विरोध केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि तेथून ते निघून गेले.

दरम्यान, आरोपीचे अन्य एका तरुणीसोबतही संबंध असल्याची माहिती संबंधित महिलेला मिळाली. याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपीने तिच्याशी शिवीगाळ केल्याचाही आरोप तिने तक्रारीत केला आहे.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा नोंदविला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.