विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मागणी

    27-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधत, वेगळ्या विदर्भाबाबत दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

समितीने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून विदर्भाच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. निवडणुकांपुरताच विदर्भाचा मुद्दा पुढे केला जातो, मात्र प्रत्यक्षात वेगळ्या राज्याच्या निर्मितीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट क्रांतीदिन हा आंदोलनाचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता दीक्षाभूमी ते संविधान चौक असा लाँग मार्च काढण्यात येणार असून, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसोबतच विदर्भातील प्रमुख नेत्यांच्या राजीनाम्याची मागणीही या मोर्चातून करण्यात येणार आहे.

या आंदोलनामुळे अनेक वर्षांपासून शांत झालेला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.