
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून मिळालेल्या प्रतिसादानंतर आता सोनम वांगचुक पुन्हा चर्चेत आले आहेत. तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सोनम वांगचुक यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, घरी परतण्याऐवजी त्यांनी वेगळाच निर्णय घेतला असून, ते सर्वप्रथम राजघाटावर जाणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. दिल्लीसह मुंबई, पाटणा आणि इतर शहरांमध्येही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवला.
या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला असून, दिल्लीमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचेही समोर आले होते. अखेर केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाने मिळाले आंदोलनाला बळ
या आंदोलनाला मोठे बळ मिळण्यामागे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी तब्बल २६ दिवस उपोषण केले होते. प्रकृती खालावल्यानंतर प्रशासनाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
यानंतर सरकारच्या हस्तक्षेपानंतर आणि जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. त्यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून नागरिकांनी प्रार्थना केल्या होत्या.
डिस्चार्जनंतर पहिली भेट राजघाटाला
रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली. मात्र, विश्रांतीसाठी थेट घरी जाण्याऐवजी त्यांनी प्रथम राजघाटाला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
"आंदोलन, संघर्ष आणि लोकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजघाटाला जाणार आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून सहानुभूती आणि पाठिंबा मिळाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी, आंदोलनाशी संबंधित मुद्द्यांवर ते अद्याप सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे.
जंतर-मंतर आंदोलनानंतर अभिजीत दिपके हे देखील अद्याप घरी परतले नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू झालेला हा लढा आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे.