
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनाला तात्पुरती स्थगिती दिल्याने निवडणूक कार्यक्रमही पुढे ढकलला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
यापूर्वीच्या नियोजनानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी गावपातळीवर प्रचाराची तयारी, बैठका, मतदार संपर्क आणि पॅनेल उभारणीला वेग दिला होता. मात्र, आयोगाच्या नव्या निर्णयामुळे या हालचालींना काही काळासाठी ब्रेक लागला आहे.
सध्या राज्यभर मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष पुनरावलोकन (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेनंतर तयार होणारी अद्ययावत विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी वापरण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
या निर्णयाचा परिणाम राज्यातील सुमारे ७५४ मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसह इतर ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेवर होणार आहे. नव्या मतदार यादीत मयत, दुबार, स्थलांतरित आणि अपात्र मतदारांची नावे वगळून अधिक विश्वासार्ह यादी तयार केली जाणार असल्याने ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतरच उमेदवारी अर्ज भरणे, छाननी, चिन्हांचे वाटप आणि मतदानाचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच राज्य निवडणूक आयोग ग्रामपंचायत निवडणुकांचे नवे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.