
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यातील अॅप-आधारित टॅक्सी सेवांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एग्रीगेटर कंपन्यांसाठी सुधारित धोरण जाहीर केले आहे. या नव्या नियमांमुळे राइड पूलिंग सेवेत प्रवाशांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे.
सुधारित नियमांनुसार, केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनाच राइड पूलिंगचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची खात्रीशीर ओळख पटवून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महिला प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे, राइड पूलिंगदरम्यान इच्छेनुसार केवळ महिला सहप्रवाशांसोबतच प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महिलांना अधिक सुरक्षित वातावरणात प्रवास करता येणार आहे.
तसेच, प्रवास सुरू झाल्यानंतर चालकाला मनमानी पद्धतीने मार्ग बदलण्यास परवानगी असणार नाही. कोणत्याही कारणामुळे मार्गात बदल आवश्यक असल्यास सर्व प्रवाशांना आधी माहिती देणे आणि त्यांची संमती घेणे आवश्यक राहील.
याशिवाय, चालक आणि प्रवाशांसाठी आचारसंहिताही निश्चित करण्यात आली आहे. विनाकारण राइड रद्द करणे, वेळेचे पालन न करणे अशा प्रकारांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
या नव्या धोरणामुळे अॅप-आधारित टॅक्सी सेवांमध्ये अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे. विशेषतः महिला प्रवाशांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.