
Image Source:(Internet)
नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. विविध मुद्द्यांवर बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य करत, "बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना... बारसं कुणाचंही असो, त्यांना लाडू खाऊ द्या," असा उपरोधिक टोला लगावला.
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी राज्यातील शेती, कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. कमी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली पाण्याची समस्या लक्षात घेऊन पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धारणी येथील आश्रमातील विषबाधा प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी सरकार या घटनेची गंभीर दखल घेत असल्याचे सांगितले. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासनाकडून तपास सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आश्रमांमधील भोजन व्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणत्याही गैरप्रकाराला सरकार पाठीशी घालणार नाही. पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात असून केंद्र आणि राज्य सरकार या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून निर्णय घेतले जात असून हलबा समाजाच्या मागण्यांवरही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या कामकाजाबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या जेसीबी मशीनचा वापर केवळ अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी केला जाईल. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
नवीन पक्ष स्थापनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. संबंधित पक्षाची भूमिका आणि कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर सरकार सतत लक्ष ठेवून असून धरणांमधील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
एचएसआरपी नंबर प्लेटच्या नियमांबाबत त्यांनी नागरिकांना सूचना देत, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आगामी काळात कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तसेच सिमेंट रस्ते खोदण्यापूर्वी भूमिगत केबल, पाइपलाइन आणि इतर सुविधांची माहिती घेऊनच नियोजन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.