आता त्याला वेळ नाही, तो आजारी आहे; अभिजीत दिपके यांच्या आईचा भावनिक खुलासा

    27-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेले विद्यार्थी नेते अभिजीत दिपके यांच्याबाबत त्यांच्या आईने भावनिक आठवणींना उजाळा दिला आहे. आंदोलनानंतर अभिजीत पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी झटत असून, त्यामुळे त्याला कुटुंबासाठी वेळ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर त्यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाची धुरा हाती घेतली. देशभरातील विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला. आंदोलनाच्या काळात अभिजीत यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठवला.

याबाबत बोलताना त्यांच्या आई म्हणाल्या, आता त्याला आमच्यासाठी वेळच मिळत नाही. त्याची तब्येतही बरी नाही. आंदोलन सुरू झाल्यापासून तो फारसा बोलत नव्हता. तो नेहमी म्हणायचा, 'मम्मी, जास्त बोलू नको, भावूक होऊ नको. मला देशभरातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या.

त्यांनी पुढे सांगितले की, अभिजीत ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात आला होता. "मी त्याला इथेच राहण्याची विनंती केली होती. मात्र, त्याने स्पष्ट सांगितले की, 'ता मला देशासाठी काम करायचे आहे. माझा विचार कमी करा आणि देशाचा जास्त करा. जंतर-मंतरवर हजारो विद्यार्थी माझी वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी मला लढायचे आहे.

एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्याबद्दल कायम काळजी वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. "तो आता देशासाठी झटणार असल्याचे सांगत होता. त्यामुळे पूर्वीसारखा वेळ आम्हाला मिळणार नाही, याची जाणीव झाली. त्याचा अभिमान वाटतो, पण आई म्हणून त्याच्या तब्येतीची आणि सुरक्षिततेची चिंता कायम असते," असे त्या म्हणाल्या.

अभिजीत दिपके यांच्या आईच्या या भावनिक वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून, अनेकांनी त्यांच्या भावना समजून घेत त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे.