तलाठी भरती २०२६चा सविस्तर अभ्यासक्रम जाहीर; १,५३९ जागांसाठी एमपीएससीमार्फत भरती

    24-Jul-2026
Total Views |
१०० गुणांची पूर्व परीक्षा,
२५ टक्के निगेटिव्ह मार्किंग

Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्रातील तलाठी पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदाची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व गट-क संयुक्त परीक्षाद्वारे होणार आहे. यंदा १,५३९ तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून प्रथमच तलाठी पदाचा समावेश गट-क संयुक्त परीक्षेत करण्यात आला आहे.

उमेदवारांची निवड १०० गुणांची संयुक्त पूर्व परीक्षा आणि ४०० गुणांची स्वतंत्र मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यांत होणार आहे. पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असून ती मराठी व इंग्रजी माध्यमातून घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी ६० मिनिटांचा कालावधी असून प्रश्नांचा दर्जा पदवी स्तराचा असेल.

पूर्व परीक्षेचे स्वरूप-
एकूण गुण : १००
प्रश्न : १००
स्वरूप : बहुपर्यायी (MCQ)
कालावधी : ६० मिनिटे
माध्यम : मराठी व इंग्रजी
२५ टक्के निगेटिव्ह मार्किंग-
या परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के (१/४) गुण वजा केले जाणार आहेत. एका प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक पर्याय निवडल्यास ते उत्तर चुकीचे मानले जाईल. मात्र, उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही नकारात्मक गुण लागू होणार नाहीत.

पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम-
'सामान्य क्षमता चाचणी' अंतर्गत पुढील विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्रासह भारताचा भूगोल
भारतीय अर्थव्यवस्था व शासकीय अर्थकारण
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी
भारतीय राज्यघटना व राज्यशास्त्र
सामान्य विज्ञान
मूलभूत अंकगणित
बुद्धिमापन व तार्किक क्षमता

अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रोफाइल तयार करावे किंवा लॉगिन करावे. त्यानंतर गट-क भरती जाहिरात निवडून पात्र पदांसाठी अर्ज भरावा. आवश्यक माहिती भरून परीक्षा केंद्र निवडल्यानंतर अर्ज शुल्क भरून अर्ज सादर करावा. अर्जाची प्रिंट काढून ती सुरक्षित ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी नव्या अभ्यासक्रमानुसार नियोजनबद्ध तयारी सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा निगेटिव्ह मार्किंग लागू करण्यात आल्याने प्रश्न सोडविताना अचूकतेवर भर देणे आवश्यक ठरणार आहे.