
Image Source:(Internet)
नागपूर : खून प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य महिला आरोपीला नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-३ने अखेर अटक करण्यात यश मिळवले. गुप्त माहितीच्या आधारे वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लावा परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून तिला पुढील कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव अश्विनी सूरज देशभ्रतार (वय ३२) असे आहे. २०२२ मध्ये कळमना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खून प्रकरणात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, पोक्सो कायदा आणि इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. विशेष म्हणजे, या प्रकरणाची फिर्यादही अश्विनी देशभ्रतार हिनेच दाखल केली होती.
न्यायालयीन सुनावणीनंतर या प्रकरणातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, मृताच्या वडिलांसह अश्विनी देशभ्रतार हिला न्यायालयाने दोषी ठरवले. मृताच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर निकाल जाहीर होण्यापूर्वीच अश्विनी फरार झाली होती. त्यानंतर ती राज्याबाहेर लपून राहत असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती.
दरम्यान, आरोपी महिला लावा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-३ला मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला आणि तिला ताब्यात घेतले. आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर कळमना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.