प्रवेशद्वारावरील तपासणीत कारवाई; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेला हादरा देणारी घटना समोर आली आहे. कारागृहातील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एका कर्मचाऱ्यालाच अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे ३ लाख रुपये किमतीची ३९ ग्रॅम चरस जप्त करण्यात आल्याने कारागृहात अमली पदार्थ पोहोचविण्याच्या संभाव्य साखळीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी सकाळी मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नियमित सुरक्षा तपासणी सुरू होती. यावेळी कारागृह कर्मचारी विकास सहारे याची तपासणी करण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडून ३९ ग्रॅम चरस आढळून आली, ज्याची अंदाजे किंमत ३ लाख रुपये आहे.
याशिवाय आरोपीकडून ७ ग्रॅम वजनाच्या निळ्या रंगाच्या संशयित गोळ्या, पाच ब्लेड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख २५० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी कारागृहातील हवालदाराने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा तसेच कारागृह अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
आरोपी अमली पदार्थ कारागृहात कोणासाठी घेऊन जात होता, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास धंतोली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि तपासणी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.