उमरेड रोडवर एमडी पावडर विक्रीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेच्या कारवाईत तस्कर अटकेत

    24-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने आणखी एक यशस्वी कारवाई केली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड रोडवर एमडी पावडरची विक्री करण्यासाठी थांबलेल्या एका तस्कराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपीकडून ७ ग्रॅमहून अधिक एमडी पावडर, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकीसह १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना उमरेड रोडवरील त्रिमूर्ती बारजवळ एक युवक अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ग्राहकांची वाट पाहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीची ओळख शेख ताज शेख रहमान कुरेशी अशी पटली. तो व्यवसायाने कसाई असल्याचे तपासात समोर आले. एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आलेल्या झडतीत त्याच्याकडून प्लास्टिकच्या पुडीत ठेवलेली ७ ग्रॅमहून अधिक एमडी पावडर जप्त करण्यात आली. तसेच त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली.

प्राथमिक चौकशीत आरोपीने इस्माईल नावाच्या व्यक्तीकडून एमडी पावडर खरेदी करून तिची विक्री करत असल्याची माहिती दिली. सुरुवातीला स्वतः अमली पदार्थांच्या आहारी गेल्यानंतर त्याने तस्करीचा मार्ग स्वीकारल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी आरोपीला पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, एमडी पावडरचा पुरवठा करणारा फरार आरोपी इस्माईल याचा पोलीस शोध घेत आहेत. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.