
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : नीट-यूजी पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP)चे संस्थापक अभिजित दीपके यांनी मोठा दावा केला आहे. आज रात्री पोलिसांकडून सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दीपके म्हणाले की, मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनात सहभागी असलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाऊ शकते. मात्र, अशा कारवाईमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवू नये. पेपरफुटीच्या विरोधातील लढा देशभर शांततापूर्ण मार्गाने सुरू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारवर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कारवाई का केली जात आहे? या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल, तर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होईपर्यंत जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जंतर-मंतर परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अलीकडील काही दिवसांत हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. काही उपद्रवी घटकांकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या घटनांमध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, अभिजित दीपके यांनी केलेल्या संभाव्य अटकेच्या दाव्याबाबत अधिकृतरीत्या पोलिसांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.