मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकार कमकुवत होत नाही; NEET वादावर अण्णा हजारे यांचे मोदींना पत्र

    23-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : NEET परीक्षेतील कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली हिंसा आणि पोलिसांची कारवाई दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी लोकशाहीत संवादाला संघर्षापेक्षा अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

आपल्या पत्रात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, एखाद्या मंत्र्याची जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा स्वीकारल्यास सरकार कमकुवत होत नाही. उलट, अशा निर्णयामुळे प्रशासनातील इतर मंत्र्यांमध्येही जबाबदारीची भावना निर्माण होईल आणि कारभार अधिक पारदर्शक व प्रभावी होण्यास मदत होईल.

जबाबदारी निश्चित होणे गरजेचे-

NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांचे पत्र महत्त्वाचे मानले जात आहे.

“जर एखाद्या विभागातील त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित केली आणि मंत्र्याचा राजीनामा घेतला, तर सरकारची सत्ता धोक्यात येत नाही. उलट, यामुळे इतर मंत्र्यांना आपल्या जबाबदाऱ्यांबाबत स्पष्ट संदेश मिळतो,” असे हजारे यांनी पत्रात नमूद केले.

विद्यार्थ्यांवरील कारवाईवर चिंता-

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेली हिंसा आणि पोलिसांच्या कारवाईबाबतही अण्णा हजारे यांनी चिंता व्यक्त केली. लोकशाही व्यवस्थेत हिंसाचार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि बळाचा अतिवापर टाळला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

त्यांनी सांगितले की, देशातील तरुण परीक्षांचे पेपर फुटणे, भरती प्रक्रियेला होणारा विलंब आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या समस्यांमुळे चिंतेत आहेत. त्यामुळे सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तरुणांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तरुणांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याचे आवाहन-

अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आवाहन केले आहे. देशातील तरुणांना न्याय्य आणि पारदर्शक व्यवस्था मिळणे आवश्यक असून, त्यांचा आत्मविश्वास टिकवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी पत्रातून सांगितले.