महिला आंदोलकावर हात उचलणाऱ्या DCP वर कारवाई; व्हिडिओ व्हायरल होताच सरकारचा निर्णय

    23-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका महिला आंदोलकावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हात उचलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. या व्हिडिओतील अधिकारी अतिरिक्त पोलीस उपायुक्त (DCP) संदीप लांबा असल्याचा दावा करण्यात आला असून, वाढत्या वादानंतर त्यांना आंदोलनाच्या विशेष ड्युटीवरून हटवून मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठवण्यात आले आहे.

२० जुलै रोजी जंतर-मंतर ते संसद असा 'संसद चलो' मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना संसदेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की व वाद झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जाते.

याच गोंधळात एका महिला आंदोलकाला डीसीपी संदीप लांबा यांनी थप्पड मारल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेनंतर अनेकांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.

वाद वाढल्यानंतर दिल्ली पोलिसांनी संदीप लांबा यांना आंदोलनाच्या ड्युटीवरून हटवले. मात्र, या घटनेबाबत दिल्ली पोलिसांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

दरम्यान, हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयातही पोहोचले आहे. वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयात व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. यावर उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना उत्तर सादर करण्याचे निर्देश देत घटनेशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संदीप लांबा हे DANIPS केडरचे वरिष्ठ अधिकारी असून सध्या दिल्ली पोलिसांत अतिरिक्त पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. घटना समोर आल्यानंतर या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू असून पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.