
नवी दिल्ली : सलग २० दिवस आमरण उपोषण केल्यानंतर ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथून ताब्यात घेत सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत पहिली अधिकृत माहिती जाहीर केली आहे.
रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या वैद्यकीय बुलेटिननुसार, दीर्घकाळ अन्नत्याग आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे सोनम वांगचुक यांना तीव्र अशक्तपणा जाणवत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक उपचार सुरू असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक २४ तास निरीक्षण करत आहे.
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी रुग्णालय प्रशासनाला महत्त्वाची सूचना दिली आहे. कुटुंबीय आणि त्यांच्या उपचारांवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय सोनम वांगचुक यांना तोंडावाटे किंवा शिरेद्वारे (IV) कोणतेही औषध अथवा उपचार देऊ नयेत, अशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून रुग्णालयात हलवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांच्या प्रकृतीकडे देशभराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.