
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर जंतर-मंतर परिसरातील आंदोलनस्थळही पोलिसांनी रिकामे करण्यास सुरुवात केली.
गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली असून त्यांना तीव्र अशक्तपणा जाणवत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी असली तरी ते शुद्धीवर असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. त्यांच्या उपचारासाठी विशेष वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी कुटुंबीय आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करू नये, अशी मागणी केली आहे.
वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सरकारवर शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचा आरोप करत या कारवाईचा निषेध केला आहे.