नागपूरमधील एल्गार सभेवरून लक्ष हटविण्यासाठी वांगचुकांवर कारवाई; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

    18-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नागपुरात होणाऱ्या 'राम मंदिर लूट' विरोधातील एल्गार सभेपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. नागपुरातील सभेकडून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच सोनम वांगचुक यांच्याविरोधात कठोर पावले उचलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

राऊत म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सलग २१ दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. चर्चा करून मार्ग काढण्याऐवजी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही लोकशाहीची नव्हे, तर दडपशाहीची पद्धत आहे."

नागपुरातील आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अयोध्येतील राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. "राम मंदिर मुक्ती आंदोलन जसे राजकीय होते, त्याचप्रमाणे हे आंदोलनही जनहिताशी संबंधित राजकीय लढा आहे," असे ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

रामरक्षा पठणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी विरोधकांवर टीका केली. "रामाचे नाव घेणाऱ्यांनी आम्हाला रामभक्तीचे धडे देण्याची गरज नाही. रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच मंदिराच्या प्रश्नांवर उत्तर द्यावे," असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे आज दुपारी नागपुरात दाखल होणार असून सायंकाळी रामनगर येथील राम मंदिरात जाऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हे आंदोलन होत असल्याचे राऊत यांनी पुन्हा स्पष्ट केले.