Image Source:(Internet)
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे शनिवारी (१८ जुलै) दुपारी रामोल-गात्राड रोडवरील महमुदपुरा परिसरातील एका उघड्या जागेतील फटाके निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर काही क्षणांतच कारखान्याला मोठी आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून १० हून अधिक कामगार गंभीर भाजले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्फोट इतका प्रचंड होता की त्याचा आवाज सुमारे एक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक घराबाहेर धावत आले. कारखान्यातून काळ्या धुराचे मोठे लोट आणि आगीच्या उंच ज्वाळा उसळताना दिसत होत्या.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आग विझविण्यासोबतच बचावकार्य सुरू केले. रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमी कामगारांना त्वरित जवळच्या रुग्णालयांत हलविण्यात आले.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कारखान्यात फटाके तयार करण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधले जात आहे.
सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.