मोठी राजकीय घडामोड? राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशासाठी भाजपची 'ही' अट चर्चेत

    18-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या संभाव्य एनडीए प्रवेशाच्या चर्चांना वेग आला असतानाच, भाजपने त्यासाठी महत्त्वाची पूर्वअट ठेवल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांनी प्रथम एकत्र येत पक्षाचे विलिनीकरण करावे, त्यानंतरच एनडीएमध्ये प्रवेशाचा प्रस्ताव विचारात घेतला जाईल, अशी भूमिका भाजपने घेतल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्वाबाबतही सकारात्मक चर्चा होऊ शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेतली होती. त्याआधी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनेही राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते.

या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार का, तसेच त्यानंतर एनडीएमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार का, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या या सर्व चर्चा राजकीय सूत्रांवर आधारित असून, संबंधित पक्षांकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.