
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनातून पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. या घटनेनंतर 'सीजेपी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्वतः बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून, २० जुलै रोजीचा संसद मोर्चा नियोजितप्रमाणेच काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना दिपके म्हणाले की, वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवून हा लढा थांबेल, असा सरकारचा समज चुकीचा आहे. "आजपासून माझे आमरण उपोषण सुरू होत आहे. २० जुलैचा संसद मोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणार असून आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील," असे त्यांनी सांगितले.
यावेळी दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्यासह अनेक कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि सोनम वांगचुक यांच्याशीही गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर जंतर-मंतर परिसरातील आंदोलनकर्त्यांना हटविण्यात आले. या घटनेविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.
याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाला त्यांच्या आरोग्याची नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने कोणत्याही नागरिकाचा जीव सर्वोच्च असल्याचे नमूद करत आवश्यक उपचार आणि वैद्यकीय देखरेख सुनिश्चित करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, डॉक्टरांच्या माहितीनुसार, सलग २० दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली असून त्यांचे वजन लक्षणीय घटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.