
नागपूर : वर्धा रोडवरील चिंचभवन पुलाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण हिट अँड रन अपघातात ७४ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मृताची ओळख नागोराव भानुदास महाजन (वय ७४, रा. सोमलवाडा) अशी झाली आहे. ते चिंचभवन परिसरातील स्वामीपुरम अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी सुमारे ८.४० वाजता ते आपल्या दुचाकीने (एमएच-३१-बीटी-४०३१) कामावर निघाले होते. चिंचभवन पुलाजवळ पोहोचताच मागून वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या महाजन यांना नागरिकांनी तत्काळ एम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी त्यांचे पुत्र प्रवीण महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. अपघातामागील नेमके कारणही तपासले जात आहे.
दरम्यान, शहरात हिट अँड रनच्या वाढत्या घटनांमुळे भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.