
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने NEET (UG) 2026 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. देशभरातील सुमारे २० लाख विद्यार्थ्यांपैकी ११.२१ लाख उमेदवार वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यंदाही मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत ५८ टक्क्यांहून अधिक यशस्वी उमेदवारांमध्ये महिलांचा सहभाग नोंदवला आहे.
यावर्षी परीक्षा देशातील ५५१ शहरांतील आणि परदेशातील १४ शहरांतील ५,४४० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत परीक्षा देता यावी म्हणून मराठीसह १३ भाषांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती.
दरम्यान, ३ मे २०२६ रोजी झालेली मूळ परीक्षा पेपरफुटी आणि अन्य अनियमिततेमुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून २०२६ रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या एका तासात NTA ने निकाल जाहीर केला.
यंदाच्या परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल यांनी ७२० पैकी ७१५ गुण मिळवत संयुक्तपणे अखिल भारतीय प्रथम क्रमांक पटकावला.
राज्यनिहाय निकालात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक १.७ लाखांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर लडाख, अंदमान-निकोबार, लक्षद्वीपसह सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
गुणांच्या आकडेवारीनुसार, १९ विद्यार्थ्यांनी ७०० पेक्षा अधिक गुण, १,४९२ विद्यार्थ्यांनी ६५० किंवा त्याहून अधिक गुण, तर १०,१६० विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एकूण १३८ विद्यार्थ्यांनी ६९० पेक्षा अधिक गुण मिळवत विशेष कामगिरी केली.
प्रवर्गनिहाय पाहता, ओबीसी-एनसीएलमधील ५.१२ लाख, सर्वसाधारण प्रवर्गातील २.९१ लाख, अनुसूचित जातीतील १.५९ लाख, अनुसूचित जमातीतील ६३,७१६ आणि जनरल-ईडब्ल्यूएसमधील ९५,०२६ उमेदवार पात्र ठरले आहेत.
निकालासोबतच कट-ऑफ गुण, अखिल भारतीय गुणवत्ता यादी, राज्यनिहाय टॉपर्स, प्रवर्गनिहाय टॉपर्स आणि भाषानिहाय आकडेवारी NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर आता एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.