देशाला दरवर्षी 21,900 कोटींची बचत शक्य

Image Source:(Internet)
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पारंपरिक गॅस सिलिंडरमध्ये वापरानंतर काही प्रमाणात गॅस शिल्लक राहत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती. मात्र, आता लिक्विड एलपीजी (LOT) सिलिंडरच्या वापरामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाला दरवर्षी सुमारे ₹21,900 कोटींची बचत होऊ शकते.
देशभरात दररोज सुमारे 40 लाख व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरले जातात. पारंपरिक 19 किलोच्या सिलिंडरमध्ये सरासरी 1 किलो गॅस शिल्लक राहतो. परिणामी, दररोज जवळपास 4 हजार टन एलपीजी वापराविना वाया जातो. वर्षभरात हा अपव्यय तब्बल 1.46 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचतो.
लिक्विड एलपीजी सिलिंडरचा वापर वाढवण्यावर भर-
इंधनाचा अपव्यय कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी आता व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना लिक्विड एलपीजी (LOT) सिलिंडर स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. या सिलिंडरमध्ये गॅसची नासाडी जवळपास होत नाही, त्यामुळे ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या गॅसचा पूर्ण वापर करता येतो.
किंमत समान, फायदा अधिक-
इंडियन ऑइलच्या दरानुसार, LOT आणि पारंपरिक VOT सिलिंडरच्या किमती समान आहेत. दिल्लीत 47.5 किलोच्या दोन्ही प्रकारच्या सिलिंडरची किंमत ₹7,332 असून, 19 किलोच्या LOT सिलिंडरची किंमतही नियमित व्यावसायिक सिलिंडरइतकीच ₹2,930 आहे.
देशभरात वाढतेय स्वीकाराचे प्रमाण-
तेल कंपन्यांनी 2007 मध्ये 47.5 किलोच्या लिक्विड एलपीजी सिलिंडरचा समावेश उत्पादन यादीत केला होता. मात्र, आता या तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होत असून देशभरातील 1,000 हून अधिक व्यावसायिक आस्थापनांनी या सिलिंडरचा स्वीकार केला आहे.
पुणे गॅस सिस्टीम्सचे कार्यकारी संचालक जेसल संपत यांनी सांगितले की, तेल कंपन्यांच्या सहकार्याने या प्रणालीचा प्रचार सुरू झाल्यानंतर ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून लिक्विड एलपीजी सिलिंडरची मागणी सातत्याने वाढत आहे. देशभरात या प्रणालीचा वापर वाढल्यास इंधन बचतीबरोबरच आर्थिकदृष्ट्याही मोठा फायदा होणार आहे.