भारतीय रेल्वेची हरित क्रांती; देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे आज रुळावर

    17-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत देशातील पहिली हायड्रोजन इंधनावर धावणारी प्रवासी रेल्वे सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणातील जिंद–सोनीपत मार्गावर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या उपक्रमामुळे हायड्रोजन तंत्रज्ञानावर आधारित रेल्वे चालवणाऱ्या निवडक देशांच्या यादीत भारताचाही समावेश होणार आहे.

पूर्णपणे भारतात विकसित आणि निर्मित करण्यात आलेल्या या रेल्वेवर सुमारे ८२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. रेल्वेमध्ये दोन हायड्रोजन पॉवर कार आणि आठ प्रवासी डबे असून, एका फेरीत सुमारे २,६०० प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता आहे.

ही रेल्वे जिंद ते सोनीपत या ८९ किलोमीटरच्या मार्गावर धावणार असून, १४ स्थानकांवर थांबेल. सकाळी ७.४० वाजता जिंदहून सुटणारी रेल्वे ९.४० वाजता सोनीपतला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ती १०.३० वाजता सोनीपतहून सुटून दुपारी १ वाजता जिंदला दाखल होईल. रेल्वेचा कमाल वेग ताशी ७५ किलोमीटर असेल.

सामान्य प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी किमान तिकीट दर ५ रुपये, तर संपूर्ण प्रवासासाठी २५ रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे.

या रेल्वेसाठी जिंद येथे देशातील सर्वात मोठे हायड्रोजन इंधन केंद्र उभारण्यात आले असून, अत्याधुनिक संपीडन प्रणालीद्वारे रेल्वेला इंधन पुरवले जाणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने हायड्रोजन गळती शोधणारी यंत्रणा, ज्वाला शोधक प्रणाली आणि २४ तास देखरेखीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे इंधन साठवणूक आणि वापर पूर्णपणे सुरक्षित राहील, असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे.

भारतीय रेल्वेच्या कार्बनमुक्त आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यात देशातील इतर मार्गांवरही हायड्रोजन रेल्वा सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे.