खामगाव अर्बन सहकारी बँकेत आयकर विभागाची धाड; कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू

    17-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

खामगाव : आयकर विभागाच्या गुप्तचर व गुन्हे अन्वेषण संचालनालयाने (I&CI) खामगाव अर्बन सहकारी बँकेत केलेल्या कारवाईत मोठ्या आर्थिक अनियमिततेचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात सुमारे २०० कोटी रुपयांचे व्यवहार तपासाच्या कक्षेत आले असून, त्यातील १०० कोटी रुपये ३५० बचत खात्यांमध्ये जमा असल्याची माहिती समोर आली आहे.

तपासादरम्यान या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे व्यवहार झाल्याचे आढळले. मात्र, या व्यवहारांची आवश्यक माहिती आयकर विभागाकडे सादर करण्यात आली नव्हती. बचत खात्यांव्यतिरिक्त चालू खाती आणि मुदत ठेवींमधील व्यवहारांचाही विभागाकडून तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे २५ कोटी रुपयांचे व्याज वितरण देखील संबंधित आर्थिक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले नसल्याचा संशय आहे. तसेच, आर्थिक व्यवहारांची माहिती एसएफटी (स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स) अंतर्गत सादर न केल्याची बाबही तपासात पुढे आली आहे.

आयकर विभागाचे अधिकारी दुसऱ्या दिवशीही बँकेत कागदपत्रांची छाननी करत होते. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी संशयित खात्यांची संख्या आणि व्यवहारांची रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विदर्भातील सहकारी बँका, नोंदणी कार्यालये, बिल्डर्स, डेव्हलपर्स, रुग्णालये आणि सराफा व्यावसायिकांकडून एसएफटी अहवाल सादर न करण्याचे प्रमाण वाढल्याने आयकर विभागाने अशा संस्थांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, १०० कोटी रुपये बचत खात्यांमध्ये, ५० कोटी रुपये चालू खात्यांमध्ये आणि २५ कोटी रुपये मुदत ठेवींमध्ये असल्याचे आढळून आले असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.