
Image Source:(Internet)
मुंबई : डोंबिवलीतील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करत इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र शाखेने २० जुलै रोजी राज्यव्यापी २४ तासांच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे राज्यातील बहुतांश खासगी व काही शासकीय रुग्णालयांतील नियमित ओपीडी सेवा बंद राहणार असून नियोजित शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात येणार आहेत.
आयएमएने दिलेल्या माहितीनुसार, हे आंदोलन २० जुलै रोजी सकाळी ६ वाजता सुरू होऊन २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील. मात्र, या काळात आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू), प्रसूती विभाग आणि इतर जीवनावश्यक वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी कोणताही अडथळा येणार नाही.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर कायदे लागू करावेत आणि रुग्णालयांमध्ये प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी आयएमएने केली आहे.
आयएमए महाराष्ट्राचे ज्येष्ठ सदस्य डॉ. मंगेश पाटे यांनी सांगितले की, डॉक्टरांनाच कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटत नसेल, तर त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.
या आंदोलनात ॲलोपॅथीबरोबरच आयुर्वेद, होमिओपॅथी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी तसेच विविध आरोग्य संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.
दरम्यान, २० जुलै रोजी नियमित तपासणी, फॉलो-अप किंवा नियोजित शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांनी संबंधित रुग्णालयाशी आधी संपर्क साधून सेवा उपलब्धतेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन आयएमएने केले आहे.