
Image Source:(Internet)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना वेग आला असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. शरद पवार यांनी एनडीएमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल, असे सांगतानाच त्यांनी पवार यांच्या पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतीपदाच्या शक्यतेवरही भाष्य केले.
आठवले म्हणाले, "शरद पवार हे देशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी 2014 किंवा 2019 मध्ये एनडीएमध्ये प्रवेश केला असता, तर राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाचा गंभीरपणे विचार झाला असता. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असती, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतले असते."
तसेच, "आजही उशीर झालेला नाही. शरद पवार यांनी एनडीएमध्ये यायचे ठरवले, तर त्यांच्या पक्षाचे आठ खासदारही आमच्यासोबत येतील. आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू," असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी यूपीए सरकारच्या काळाचाही उल्लेख केला. "त्यावेळी काँग्रेस नेतृत्वाशी अधिक जवळीक साधली असती, तर मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळाऐवजी शरद पवार यांनाही पंतप्रधान होण्याची संधी मिळाली असती," असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सहभागी होणार का, याबाबत अद्याप पक्षाकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.