नागपुरात अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्राला मंजुरी; ग्रामीण रुग्णांसाठी मोठा दिलासा

    17-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील कर्करोग रुग्णांना आधुनिक उपचार सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाकेअरच्या माध्यमातून 'नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट' या उपकंपनीच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाकेअर संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पामुळे विदर्भासह ग्रामीण भागातील रुग्णांना कर्करोगाचे अत्याधुनिक निदान आणि उपचार आपल्या जवळच्या परिसरात मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी होणारी धावपळ कमी होण्यासोबतच वेळ आणि खर्चाचीही लक्षणीय बचत होणार आहे.

बैठकीत महाकेअरच्या कॉर्पस निधीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून १०० कोटी रुपयांच्या तत्त्वतः निधीस मंजुरी देण्यात आली. तसेच सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी उभारणी, जी.टी. रुग्णालय परिसरात महाकेअरच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, लेखापरीक्षक आणि कंपनी सचिवांची नियुक्ती तसेच विविध तज्ज्ञ सल्लागार नेमण्यालाही मान्यता देण्यात आली.

राज्यातील कर्करोग उपचार अधिक सक्षम करण्यासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्यामुळे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, संशोधन आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील रुग्णांना मिळणार आहे.

नागपूरनंतर मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक आणि अमरावती येथेही अशाच प्रकारची अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्रे उभारण्याचा सरकारचा मानस आहे. राज्यभर दर्जेदार आणि सुलभ कर्करोग उपचारांचे जाळे निर्माण करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.