आयएमडीचा इशारा; पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार; २० जुलैनंतर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

    15-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिके कोमेजू लागली असून दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दहा तासांत देशातील १५ राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तसेच ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. किनारपट्टी भागातील मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः उत्तर आणि पूर्व भारतात पुढील काही तासांत पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास, जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर दुसऱ्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतीसह पाणीटंचाईची चिंता वाढू लागली आहे. मात्र आता हवामानात बदल होत असून राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुढील काही तासांत मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २० जुलैनंतर राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाच्या ताज्या अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.