
Image Source:(Internet)
नागपूर : शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अविस्मरणीय ठरलेला 'गळाभेट' उपक्रम नागपूर मध्यवर्ती कारागृहात पार पडला. या उपक्रमामुळे अनेक महिन्यांपासून आपल्या मुलांपासून दूर असलेल्या 166 कैद्यांना 283 मुलं, भावंडं आणि नातवंडांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. या भेटीदरम्यान कारागृह परिसर भावनांनी ओथंबून गेला.
सुरुवातीला लाजणारी चिमुकली काही क्षणांतच वडिलांच्या कुशीत विसावली. अनेक कैद्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले, तर कुटुंबीयांनीही तब्बल 30 मिनिटांचा सहवास मनापासून अनुभवला. अनेकांसाठी हा क्षण आयुष्यभराची आठवण ठरला.
या कार्यक्रमाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. आयचित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कैद्यांना चांगले आचरण ठेवून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे आवाहन केले. प्रत्येकाला सुधारण्याची संधी असते, असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात एका बालकाने आईवरील कविता सादर केली, तर सहा वर्षांच्या चिमुरडीने सादर केलेल्या गीताने उपस्थितांना भावूक केले. कारागृह प्रशासनाने कुटुंबीयांसाठी विशेष भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. तसेच कैद्यांनी स्वतःच्या मानधनातून खरेदी केलेली बिस्किटे, चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थ आपल्या मुलांना प्रेमाने भेट दिले.
यावेळी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने 220 कैद्यांच्या मुलांना शालेय दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, डबा आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
कैद्यांचे पुनर्वसन, कुटुंबाशी असलेले नाते अधिक मजबूत करणे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले. कठोर कारागृहाच्या भिंतीआडही माणुसकी, प्रेम आणि आपुलकी जिवंत असल्याचा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.