
Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर क्राइम ब्रँचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत तब्बल 150 किलो गांजा जप्त केला आहे. मालवाहतुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या या तस्करीचा पर्दाफाश पारडी परिसरात करण्यात आला. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून ट्रकसह सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांना ओडिशातून मुंबईकडे मोठ्या प्रमाणात गांजा पाठवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार नागपूर-हैदराबाद रिंग रोडवरील एका ठिकाणी सापळा रचून संशयित ट्रकची तपासणी करण्यात आली.
सुरुवातीला ट्रकमध्ये स्टीलचे कॉइल असल्याचे दिसून आले. मात्र सखोल तपासणीदरम्यान या कॉइलच्या खाली काळजीपूर्वक लपवून ठेवलेला गांजाचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रक चालकासह दोन आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जोगेश धर्मोधर देवूरी (वय 30) आणि महेंद्र हुरदा देवूरी (वय 40) अशी असून ते ओडिशा राज्यातील रहिवासी आहेत. प्राथमिक चौकशीत जप्त केलेला गांजा मुंबईत पोहोचविण्याचा कट असल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईत सुमारे 37 लाख रुपयांचा गांजा, मालवाहू ट्रक आणि इतर साहित्य असा एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपी आणि तस्करीच्या साखळीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
अमली पदार्थांच्या या मोठ्या जाळ्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, तसेच राज्यातील इतर भागांशी या रॅकेटचे संबंध आहेत का, याचा तपास आता क्राइम ब्रँचकडून सुरू आहे.